Monday, September 17, 2012

'माझ्यातील मी हरवली'

काय झाले आज मजसी
अशी कशी मी बदलली
बसले काही लिहिण्यासी
परंतु लेखणीच थांबली

जादू ही कुठली झाली
माझ्यातील मी हरवली
जाळ्यात प्रश्नांच्या अडकली
सोडली का साथ शब्दांनी?

हळू हळू शांत झाली
स्वतःस समजू लागली
विचारात तुझ्या गुंतलेली
लिहू कसे वेगळे त्याहुनी

कुणी म्हणे बावरी झाली
जशी राधा घनश्यामची
न उरली भ्रांत या जगाची
माझा तू अन तुझीच मी

तुझ्या भेटीची स्वप्ने सजवणारी
आता आठवणीत जगू लागली
प्रत्येक भेटीची होती कहाणी
कहाणीतली दुनिया ती न्यारी

सुरुवात नव्या आयुष्याची
उभी आहे एका वळणावरती
नवी स्वप्ने सजवू लागली
त्यातची मी रमू लागली



मधुरा खळतकर

Wednesday, July 25, 2012

आतुरलेले मन...

भेटायासी कुणाला
लागले वेध मनाला
अवतीभवती आता
जीव काही रमेना

काळ सरू लागला 
दिवस मोजता मोजता
एक एक दिवस जणू
युगांसमान वाटला

मोजणी हळू हळू
तासंवारती आली
क्षणांच्या दिशेने  
वाट पाहू लागली

मागे वळून पाहता  
वाटे आश्चर्य मजला
प्रतिक्षेचा काळ कसा  
अचानक संपला!!!

रंगीबेरंगी स्वप्नांची 
फुले ओंजळीत सजली
उधळण्याची जणू ती
वेळ येऊ लागली

 मधुरा खळतकर  

Wednesday, June 20, 2012

'स्वप्नातील चिंब क्षण'

खिडकीबाहेर बघता बघता
गेले मी हरवून
मुसळधार पावसात जणू
गेले मी भिजून

पावसात या भिजली झाडे
फांदींना त्या बांधली झुले
चिंब चिंब मी भिजले होते
उंच उंच झोके घेत होते

तळे साचले हौद तुंबले
वाहत जाई कागदी नावे
नावेकडे त्या पाहत होते
नावेतून मी वाहत होते

पावसात आली तुझी आठवण
एक छत्री अन् दोघे आपण
हातात हात धरले होते
हळूच मी लाजत होते

नभातुनी या वीज चमकली
इंद्रधनूची कमान दिसली
ढगांचे जणू बनले घोडे
रथात बसुनी चाललो दोघे

जाऊ लागली अपुली स्वारी
सप्तरंगांच्या सुंदर गावी
नयनांचे पारणे फिटले
मनोमनी मी शहारले

बघता बघता पाऊस सरला
भान त्याचे नाही मजला
खिडकीतच मी बसले होते
स्वप्नातच मी भिजले होते

मधुरा खळतकर

Sunday, June 10, 2012

'कसा आहेस तू...'

जाणू कसे तुला सांग मी
शोध तुझा मन हे घेई
हवा मला तसाच का तू
कसा आहेस तू...

आठवते पहिले बोलणे अपुले
दोघांनाही प्रश्नची पडले
प्रश्नांच्या खेळात काहीसे जाणले
कसा आहेस तू...

तुझी माझी जोडी जमेल का
एकमेकांना समजून घेऊ का
रुसता मी मनधरणी करशील का तू
कसा आहेस तू...

भेट कधी होणार अपुली
उत्सुकता मनास लागली
सातासमुद्रापलीकडे तू
कसा आहेस तू...


मधुरा खळतकर

Tuesday, May 15, 2012

'स्वछंद मन'

आज नभ कसे शुभ्र वाटते
वादळानंतरची शांतता भासे
दाटलेले घन आज मोकळे झाले 
उंच भरारी आज घेई पाखरे

माझेही काही असेच झाले
ओठावर आले आनंदी गाणे
सारे दडपण सारे ओझे 
पिसासारखे उडुनी गेले

मन हे कसे वेडे असते 
येथे तेथे रमत असते
प्रवाहात ते वाहत जाते
संथ होण्याची मग वाट पाहते

कोमेजलेले मन फुलून गेले
पक्ष्यासारखे उडू लागले
स्वधुंदीत ते नाचू लागले
वर्तमानात आता जगू लागले




मधुरा खळतकर

Thursday, April 26, 2012

'उन्हाळ्याची सुट्टी'

सुट्टी सुट्टी उन्हाळ्याची सुट्टी
परीक्षा संपली, आली हक्काची सुट्टी

शाळा नाही अभ्यास नाही
उनाड उद्योग अन् दिवसभर मस्ती

कुठे उन्हाळी शिबीर कुठे सहल थंड गावी
खट्याळ भावंडांची साऱ्या जमेल गट्टी

आंब्याच्या रसाची असेल मेजवानी
रंगेल पत्यांचे डाव, नसेल गृहपाठाची धास्ती

येईल गप्पांना ऊत, आठवू जुन्या आठवणी
कुलरच्या हवेत ऐकू आजीच्या गोष्टी





मधुरा खळतकर

Tuesday, April 17, 2012

'इंद्रधनुष्य'

निसर्गाची किमया
ईश्वराची माया
कुणाचे हे सप्तरंग
दिसे सुंदर हे इंद्रधनुष्य

कुणा कवीची ही उपमा
कथेतील भाबडी कल्पना
कुणा चित्रकाराचे रंग
दिसे सुंदर हे इंद्रधनुष्य

विविध रंगांचे मिलन
एकाजुटिचा हा अविष्कार
देई आपणा संदेश
दिसे सुंदर हे इंद्रधनुष्य



मधुरा खळतकर